भावनिक, रहस्यपूर्ण, थरारक कथा   

रुपेरी पडदा : कल्पना खरे 

जेव्हा जेव्हा पृथ्वीवर काही अधर्म, अराजक माजले तेव्हा तेव्हा भगवंतांनी माणसांच्या रक्षणासाठी ‘अवतार’ घेतले हे आपल्या पौराणिक कथा-कहाण्यांमध्ये वाचले आहेच; पण जेव्हा सामान्य माणसातला ‘देव’ जागृत होऊन या अधर्मांविरुद्ध लढा देतो, तेव्हा काय घडते, याचा प्रत्यय सध्या प्रदर्शित होत असलेल्या ‘देवमाणूस’ चित्रपटात पाहायला मिळत आहे.
 
केशव (महेश मांजरेकर) हे एक सेवानिवृत्त शिक्षक, पत्नी लक्ष्मी (रेणुका शहाणे) सोबत कोपरगाव येथील वडिलोपार्जित वाड्यात राहात असतात. लक्ष्मी घरगुती हातमागावर पैठणी विणून देण्याचा व्यवसाय करत असते. त्यांचा मुलगा माधव (रुतुराज शिंदे) परदेशात शिक्षण घेऊन तिकडेच लग्न करुन स्थायिक झालेला असतो. त्याच्या शिक्षणासाठी केशवरावांनी आपला वडिलोपार्जित वाडा दिलीपशेठ (सिद्धार्थ बोडके)कडे गहाण ठेवून पैसे उभे केले असतात. माधव तिकडून पैसे पाठवणे बंद करतो, मग इकडे कर्जाचे हप्तेही भरणे अशक्य होते. क्रूरकर्मा दिलीप वसुलीसाठी विविध मार्गाने या सत्शील दांपत्याचा छळ सुरु करतो. त्याचे किळसवाण्या प्रकारे अनैतिक कामासाठी घराचा वापर करणे या काका-काकूंना सहन करावे लागते. एके दिवशी वाड्यातील शेजारची मुलगी रमा (अवनी ताम्हाणे) यांच्याकडे आली असताना त्या हैवानाची वक्र नजर तिच्यावर पडते. हे लक्षात आल्यावर केशव मास्तर पेटून उठतात. एका निद्रिस्त ज्वालामुखीचा जणू उद्रेक होतो आणि एका असुरी शक्तीचा अंत होतो.
 
काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘वध’ या हिंदी चित्रपटाच्या संकल्पनेवर हा चित्रपट बेतलेला आहे. नेहा शितोळेने पटकथा-संवाद सुंदर लिहिले असून तेजस देऊसकर यांचे दिग्दर्शनही प्रभावी झाले आहे. विशेषत: दशावतारातील नृसिंहावतार, पंढरीची वारी यांचा चपखल वापर केलेला दिसतो. अद्वैत नेमळेकरचे पार्श्वसंगीतही उत्तम आहे. सई ताम्हणकरची लावणी चांगली असून ती मात्र उगीच या कथानकात घुसडल्यासारखी वाटते.
 
महेश मांजरेकर आणि रेणुका शहाणे दोघांचेही अभिनय अप्रतिम आहेत. दिलीपच्या खलनायकी भूमिकेचे आव्हान सिद्धार्थ बोडकेने उत्कृष्ठ पेलले आहे. विलास जेधेच्या निगेटिव्ह भूमिकेत अभिजीत खांडकेकर तसेच त्याच्या पत्नीच्या भूमिकेत पूर्णिमा डे ठीकठाक आहेत. डॉ. मोहन आगाशे पाहुणे कलाकार आहेत. ‘सिंघम’ स्टाइल इन्स्पेक्टर देशमुख भूमिकेत सुबोध भावे एकदम भाव खाऊन जातो.
 
ज्यांनी ‘वध’ पाहिला आहे त्यांना ‘देवमाणूस’मध्ये कदाचित काही त्रुटी जाणवतील; परंतु एकंदरित प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा हा चित्रपट भावनिक, रहस्यपूर्ण, थरारक अशा सर्व गुणांनी परिपूर्ण झाला आहे.
 
पटकथा-संवाद : नेहा शितोळे
दिग्दर्शक : तेजस प्रभा, विजय देऊसकर
कलाकार : महेश मांजरेकर, रेणुका शहाणे, सिद्धार्थ बोडके, सुबोध भावे, अभिजीत खांडकेकर, पूर्णिमा डे, डॉ. मोहन आगाशे.
 

Related Articles